रावसाचे पॅटिस्
साहित्य – ७ ते ८ रावसाचे बोनलेस तुकडे, २ tbl spn आले – लसुन आणि मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, एक उकडलेला बटाटा, १ tea spn हळद, ३ tbl spn ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला, एक अंड ( Chicken egg ), २ tbl spn लिंबाचा रस, ३ tbl spn तांदळाचे पीठ, एक वाटी ब्रेड क्रंब्स ( ब्रेडचा चुरा ), चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल.
कृती – प्रथम रावसाचे तुकडे स्वच्छ धुवून त्याचा खिमा तयार करावा. खिमा तयार झाल्यावर एका मोठ्या वाटीत काढून त्यात २ चमचे आले – लसुन आणि मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, एक उकडलेला बटाटा एक चमचा हळद, ३ चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला, २ चमचे लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. एका वाटीत एक अंड चांगले फेटून घ्या. एका प्लेट मध्ये ब्रेड क्रंब्स आणि तांदळाचे पीठ मिक्स करून पसरवून घ्या. आता आपल्याला रावसाच्या मिश्रणाच्या गोल आकाराच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत अर्थात पॅटिस् तयार करायचे आहेत. रावसाच्या मिश्रणाचा एक मध्यम गोळा तयार करून त्याला दोन्ही हाताने अलगद दाबा म्हणजे तुम्हाला पॅटिसचा तंतोतंत लुक मिळेल. आता हे रावसाचे पॅटिस् फेटलेल्या अंड्यात घोळून नंतर ब्रेड क्रंब्सच्या मिश्रणाने कोट करून घ्या. ब्रेड क्रंब्सच्या मिश्रणात तांदळाचे पीठ मिक्स केल्याने पॅटिसचा वरचा भाग कुरकुरीत होणार आहे. अशाच प्रकारे बाकीचे पॅटिस् तयार करून घ्या. पॅटिस् तयार झाल्यावर एका प्यानमध्ये तेल गरम करून हे पॅटिस् मंद आचेवर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. पॅटिस् तेलात चांगले तळून झाल्यावर एका छान प्लेट मध्ये काढून गरमागरम सर्व्ह करा.

There are no comments