• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Stuffed Kantoli – भरलेली कंटोली ( रान भाजी )

पावसाळयातील पालेभाज्या आणि फुलभाज्यांनंतर ही एक फळभाजी आहे. पावसाळा सुरू झाला की रानावनात जुन्या वेलीच्या मुळाच्या गाठीपासून अथवा बिया रूजून ह्य़ा वेलींना मोहोर फुटतो. त्याची झपाटय़ाने वाढ होऊन पाच ते सहा पानांवर असतानाच जंगलांत सर्वत्र हया जमिनीलगत वाढलेल्या वेलींवर पिवळी फुले दिसू लागतात. बारा-पंधरा दिवसातर कंटोली धरतात. आदिवासी ती शोधून बाजारात आणतात. कंटोली फळांची भाजी खूपच लोकप्रिय आहे. फळे साधारणत: पाच ते सात से.मी. लांबीची असतात. आकाराने लांबट-गोल असतात व त्यावर मऊ काटे असतात. फळात बीया भरपूर असतात. कोवळ्या फळांची भाजीच चांगली होते.
कारल्याच्या वर्गातील व सर्वात जास्त फळभाज्या ज्या कुळातील आहेत, त्या ककुरबीटॅसी कुळातील ह्य़ा झाडाचे शास्त्रीय नाव आहे, Momordica dioica. भाजी रूचकर असते पण हलकी कडवट. विविध प्रकारांनी ही भाजी केली जाते, पण वालाच्या आमटीत टाकून केलेली भाजी अथवा भरलेली कंटोली छान लागतात. कारल्याच्या वर्गातील असल्याने औषधात त्याचे कडू गुणधर्म असून ते जठरोतेजक व सारक आहेत.

साहित्य – १५ कंटोली, अर्ध्या ओल्या नारळाचा खीस, ७-८ कडीपत्त्याची पाने, अर्धी वाटी कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, १०-१२ लसणाच्या पाकळ्या, १/२ tea spn हळद, १ tbl spn लिंबाचा रस, चिमूटभर हिंग, १/२ tbl spn राई-जीरे आणि चवीनुसार मीठ.

कृती – कंटोली भरण्यासाठी लागणारे सारण अर्थात त्यासाठी सर्वप्रथम वाटण तयार करून घ्या. वाटणासाठी ओल्या नारळाचा खीस, कोथिंबीर, मिरच्या, आले, लसणाच्या पाकळ्या इत्यादी सामग्री पाट्यावर किंव्हा मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून वाटून घ्या. एका पॅनमध्ये २ tbl spn तेल टाकून चांगले तापवून घ्या. तेल तापल्यानंतर त्यात राई जिरे फोडणीसाठी टाका. सोबत कडीपत्त्याची पाने, हिंग टाकून घ्या. फोडणी हलकी परतून घ्या. आता या फोडणीत तयार वाटण टाका. वाटण या फोडणीत एकजीव करून चांगले परतून घ्या. परतून झाल्यावर यात हळद, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाका. संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करून १० मिनिटे खरपूस भाजून घ्या. तयार सारण एका बाउल मध्ये काढून घ्या. कंटोली स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. कंटोलीला आत सारण भरण्यासाठी अर्धी चिर पाडून घ्या. आतील सर्व बिया काढून घ्या. बिया काढताना कंटोलीचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्या. सर्व कंटोलींना चिरा पाडून झाल्यानंतर यात तयार सारण म्हणजेच आपण अगोदर जे वाटण तयार करून घेतले आहे ते या कंटोली मध्ये दाबून भरून घ्या. पॅनमध्ये २ tbl spn तेल तापवून सर्व कंटोली मंद गॅस वर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. कंटोली तळून झाल्यानंतर गरमागरम सर्व्ह करा.

टीप : कंटोली तळताना त्यांना जास्त ( over cook ) शिजवू नका. हलकी कच्ची असल्यावर भरलेली कंटोली खाताना अधिक सुंदर लागतात.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *