
gabolichi bhaji – गाबोळीची भाजी (रान भाजी)
साहित्य – २-३ जुड्या गाबोळीची भाजी (उलशीचा मोहोर), १०० ग्रॅम ओल्या नारळाचा खीस, ७-८ ठेचलेले लसूण पाकळी, ३ कांदे बारीक चिरलेले, ४-५ हिरव्या मिरच्या, १/२ tbl spn राई, १/२ tbl spn जीरे, १ tea spn हळद, ३ tbl spn बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ.
पावसाळ्यात रानावनात साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये उळशीच्या वेलींना मोहोर फुटायला तयार होतो. हा मोहोर मासळीच्या अंड्यांप्रमाणे दिसून येतो. कोळीवाड्यात मासळीच्या ‘अंडींना’ गाबोळी म्हणून संबोधले जाते तसेच हि भाजी खाल्ल्यानंतर हुबेहूब मासळीची अंडी म्हणजेच गाबोळी खाल्ल्याचा भास होतो. पावसाळा सुरु झाला कि आपल्या जवळच्या बाजारात अनेक रानभाज्या दाखल होत असतात. पण गाबोळीची भाजी हि दुर्मिळच दिसून येते. मुरबाड, ठाणे, डहाणू आणि रायगड जिल्ह्यामध्ये हि भाजी आपसूकच दिसून येते. हा उळशीचा मोहोर नेमका दिसतो कसा ते पाहूया.
कृती – एका खोलगट पॅन मध्ये ३ tbl spn तेल तापवून घ्या. तेल तापल्यावर त्यात राई-जीरे टाका. राई-जीरे तडखायला लागले कि यात लसूण पाकळ्या, हिंग, बारीक चिरलेल्या मिरच्या टाका. परतून घ्या. परतून झाल्यानंतर यात कांदा टाका आणि तांबूस रंगापर्यंत परतून घ्या. कांदा तांबूस रंगापर्यंत दिसू लागल्यावर यात हळद टाका. परतून घ्या. आता यात गाबोळीची भाजी घाला. ( वेली सकट एका भांड्यात कोमट पाणी करून त्यात हि भाजी १० मिनिटांकरिता ठेवावी. मोहोरमध्ये लपून बसलेली धूळ आणि माती तळाला जमा होईल. नंतर सध्या पाण्याने पुन्हा धुवून घ्यावी. हि भाजी निवडताना त्याच्या फक्त शेरी घ्यायच्या.) भाजी फोडणीमध्ये चांगली एकजीव करून घ्या. भाजीच्या भांड्यावर झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा. १० मिनिटानंतर यात ओल्या नारळाचा खीस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. चवीनुसार मीठ टाकून घ्या. संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. पुन्हा झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. १० मिनिटानंतर हलकी परतून घ्या आणि एका बाऊलमध्ये काढून गरमागरम सर्व्ह करा.
There are no comments