
भरलेला साबुदाणा वडा
साहित्य – आपल्या सोयीनुसार साबुदाणे. मी येथे १५० ग्रॅम साबुदाणे घेतले आहेत, एक वाटी दूध, एक वाटी साखर, एक वाटी ड्रायफ्रूट्स, एक चमचा वेलची पूड, एक चमचा जिरे, २ उकडलेली बटाटी, अर्धी वाटी साजूक तूप, एक वाटी ओले खोबरे , एक चमचा खसखस, एक चमचा तीळ, ५ ते ६ कडीपत्त्याची पाने, २ उभ्या चिरलेल्या मिरच्या. ( मीठ हे पर्यायी आहे )
कृती – सर्व प्रथम साबुदाणे रात्रभर भिजत ठेवावे. सर्व ड्रायफ्रूट्स क्रश करून घ्यावे. एका प्यान मध्ये २ चमचे तेल घेऊन त्यात एक चमचा जिरे, २ मिरच्यांचे काप, आणि काडिपत्त्यांची पाने टाकून फोडणी द्यावी. एका भांड्यात उकडलेली बटाटी आणि साबुदाणे घेऊन त्यावर ही तयार फोडणी टाकावी. फोडणी टाकल्यावर त्यातल्या मिरच्या आणि कडीपत्त्याची पाने काढून टाकावीत. आपल्याला फक्त मिरची आणि काडिपत्त्याचा फ्लेव्हर हवा आहे. यात जर आपणास मीठ हवे असेल तर ते वापरू शकता. सर्व मिश्रण एकजीव करून त्याचा लगदा तयार करावा. आता आपण साबुदाण्याच्या वड्यात भरण्यासाठी सारण तयार करूया. त्यासाठी एक प्यानमध्ये २ चमचे साजूक तूप घेऊन गरम करावे. तूप गरम झाल्यावर त्यात एक वाटी ओले खोबरे टाकावे. एक चमचा तीळ टाकावे. एक चमचा खसखस टाकावी. एक छोटा चमचा वेलची पूड टाकावी. अर्धी वाटी साखर टाकावी. ( आपणास जास्त गोड हवे असल्यास साखरेचे प्रमाण वाढवू शकता. ) क्रश केलेले ड्रायफ्रूट्स टाकावे. सर्व मिश्रण तांबूस रंगापर्यंत परतून घ्यावे. तयार स्टफिंग एका मोठ्या वाटीत काढून घ्यावी आणि थंड करावी. मिश्रण थंड झाल्यावर गोळ्या इतके साबुदाण्याचे मिश्रण घेऊन खोलगट आकार द्यावा आणि त्यात मावेल इतके स्टफिंग ( सारण ) टाकावे. साबुदाण्याच्या मिश्रणाचे वरचे मुख बंद करून त्याला वड्याचा आकार द्यावा. अशा प्रकारे सर्व वडे आपण स्टफिंगने भरून तयार करावे. कढईत तळण्याकरिता तेल घेऊन ते चांगले तापवावे आणि त्यात एक एक करून वडे तळण्याकरिता सोडावे. वडे सोनेरी रंगापर्यंत खरपूस तळून घ्यावे. तयार वडे टिशू पेपरवर काढून घ्यावेत. वड्यांच्या वरच्या टॉपींगसाठी सर्व प्रथम एका प्यान मध्ये एक चमचा साजूक तूप घेऊन त्यात उकडलेली बटाटी टाकावी. अर्धा चमचा वेलची पूड, आपल्या गोडीनुसार साखर आणि एक वाटी दूध टाकावे. सर्व मिश्रण परतून घ्यावे. दुधाला एक उकळी काढावी उकळी आल्यावर सर्व मिश्रण एक मॅशरच्या साहाय्याने मॅश ( कुस्कुरून ) घ्यावे. सर्व मिश्रण थंड करून एक पाईपिंग बॅगमध्ये काढावे. पाईपिंग बॅगला आपल्या आवडती नोजेल लावून वड्यांवर आपल्या आवडीनुसार सुंदर सजावट करून घ्यावी. तयार आहे सुंदर आणि इनोव्हेटिव्ह अशी एक उपवास आणि डेझर्ट मिक्क्स भरलेल्या साबुदाण्याची डिश.
Wow, khoop chhan recipe