• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

कोळीवाड्यातील कोळी बांधव

कोणत्याही प्रदेशाची लोकसंस्कृती, माणसाचे स्वभाव , व्यापारवृत्ती , वैभव आणि पडता काळ या सर्व गोष्टी त्या त्या प्रदेशाच्या इतिहास आणि भूगोलाची निश्पत्ती असते. किंबहुना भौगोलिक वैशिष्ट्यांमधूनच या प्रदेशाचा चेहरा तयार होत जातो, इतिहास घडतो, भविष्य ठरत जाते. आपल्या महाराष्ट्राला उत्तरेत दमण गंगेपासून दक्षिणेत तेरेखोलच्या खाडी पर्यंत लाभलेल्या सागरी किनारपट्टीचा चेहराहि भौगोलिक वैशिष्ट्यांनी घडला आहे.

सागरी जीवना विषयी बोलताना आपण लगेच सर्वसाधारणपणे १६ व्या शतकापर्यंत जावून पोहचतो आणि डोळ्या समोर चित्र उभे राहते ते सुंदर दर्या सागर, खळखळणाऱ्या लाटांचा आवाज, नारळी पोफळी च्या बागा, लहान लहान कौलारू घरे, कोळी बांधव आणि त्यांची जीवन शैली. येथील जैवविविधता, परंपरा, पाककृती आणि भाषांमध्ये कोलीवाड्यांचे वेगळेपण आहे. आपल्या शांत कुशीतून जागतिकीकरणालाहि लाजवेल अशी भरारी आता येथील प्रत्येक कोळी बांधव घेत आहे. मग ते पारंपारिक सण, महोत्सव, लग्न सोहळे किंव्हा जत्रा असो आपला पारंपारिक पोशाख आणि दागिने घालून सर्वांनाच आकर्षित करीत आलेला आहे. याचं जिवंत उदाहरण द्यायचं झाल तर नुकतेच पार पडलेले महाराष्ट्रातील कोळी महोत्सव. सर्व सामान्य जनतेला आपल्या धम्माल कोळी गीतांनी आणि नृत्यांनी नाचवणारा हाच आमचा ‘कोळी समाज ‘.

पण तितकीच मेहनत आणि कस याला विसरून नाही चालणार. थोडक्यात सांगायचं झाल तर मासेमारीच्या व्यवसायात कोळी स्त्री – पुरुषांच्या कामाची विभागणी जणू ठरुन गेलेली आहे . समुद्रात जाऊन मासे आणण्याचं काम पूर्णपणे पुरुषाने करायचं . मासे पकडणं , होडी चालवणंच नाही , तर मासेमारीसाठी लागणारी जाळी विणणं , होडी नांगरण्यासाठी लागणारं दोरखंड तयार करणं ही सगळी कामं पूर्वापार फक्त कोळी पुरुषच करत आले आहेत .मात्र एकदा का मासेमारीहून होड्या परत आल्या आणि होडीवरच्या बाप्यामाणसांनी मासळी किनाऱ्यावर उतरवून दिली की , हा व्यवसाय पूर्णपणे महिलांच्या ताब्यात जातो . ती मासळी कोळंबी , बोंबिल , मांदेली , पापलेट अशी प्रकारानुसार वेगवेगळी करणं , तिचा लिलाव करणं , लिलावात मासळी विकत घेणं आणि ती मग गावोगावी नेऊन विकणं हे सारं काम कोळी महिलाच करतात. दिवसेंदिवस मासळीचे भाव वाढत आहेत , पण त्यातला फार कमी टक्का प्रत्यक्ष कोळ्यांच्या खिशात जातो. आपणा सर्वांना मासळी खावयास तर मिळते पण यासाठी लागणारी मेहनत ती फक्त दर्यावर्दी कोळी नाखवाच जाणतो. पण तरी देखील कायम चेहऱ्यावर एक स्मित हास्य, आणि गोडवा ठेवणारा आमचा कोळी बांधव तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक कोळीवाड्यात आवर्जून दिसून येईल.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *