पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी – Rice Roti
साहित्य – ६०० ग्रॅम भाकरीच्या तांदळाचे पीठ आणि त्याच्या सम प्रमाणात पाणी.
कृती – ६०० ग्रॅम तांदळाचे पीठ ( या भाकरीसाठी खास वेगळे जाडसर तांदूळ बाजारात मिळतात, त्यांना भाकरीचे तांदूळ म्हणतात. ) ज्या प्रमाणात आपल्या पिठाचे प्रमाण असेल त्याच प्रमाणात पाणी घ्यायचे. संपूर्ण पीठ चाळणीने चाळून घ्यायचे ( चक्कीतून आणल्यावर त्यात थोडाफार कचरा असतो व तो पीठ मळताना आणि खाताना दाताखाली कचकचतो म्ह्णून पीठ चाळून घेणे अधिक उत्तम ). सांगीतल्याप्रमाणे एका भांड्यात पिठाच्या सम प्रमाणात पाणी घेऊन ते चांगले उकळून घ्यावे. आता यात सर्व पीठ टाकून पिठाची उकड करून घ्यायची आहे. साधारण २ मिनिटे सर्व पीठ उकळत्या पाण्यात घोटून घ्यावे आणि नंतर घ्यास बंद करावा. आता हे तांदळाच्या उकडीचे सर्व पीठ एका परातीत काढून घ्यायचे. पीठ मळण्यासाठी आणि भाकरी थापण्यासाठी साध्या पाण्याचा वापर करावा. हातात मूठभर साधे पाणी घेऊन पिठात टाकावे. आता पीठ मळण्यास सुरुवात करावी. हाताला पिठाचा अंदाज घेऊनच थोडे थोडे साधे पाणी टाकावे कारण पीठ मऊसर होई पर्यंत मळायचे आहे. ( साधे पाणी जर जास्त प्रमाणात पिठात गेले तर भाकरी वळताना ती सारखी फाटत राहील. ). पीठ आता रगडून रगडून चांगले मळून घ्यावे. मळून झालेले पीठ एका थाळीत काढून घ्यावे. साधारण दोन हातात मावेल इतका पिठाचा गोळा घ्यायचा. त्याला पुन्हा थोडे मळून घ्यावे. आता भाकरी थापण्यासाठी परातीत थोडे पाणी घ्यायचे ( साधारण ४ चमचे ). त्या पाण्यावर पुन्हा पिठाचा गोळा चांगला मळून घ्यावा. पिठाला शंखासारखा त्रिकोणी आकार द्यावा . वरील त्रिकोणी बाजूस थोडे प्रेस करून घ्यावे . आता या पिठाला दोन्ही हातात घेऊन गोल गोल फिरवून थोडी मोठ्या आकारात पसरवावी. आता परातीत पुन्हा तेवढेच पाणी घ्यायचे आहे जेवढे अगोदर पीठ थापण्यासाठी घेतले होते. पाणी परातीत चांगले सर्व बाजूने पसरवून घ्यावे. आपल्या तळ हाताच्या साहाय्याने तीला गोल आकार देत मोठ्या आकारात करून घ्यावी. गोल आकारात वळवताना भाकरीचे काठ मोडून घ्यावे. आता भाकरीला उचलून तीची मागील बाजू देखील सारख्याच पद्धतीने मोठी करून घ्यावी. ( मागील बाजू म्हणजे भाकरी उलटून तीची दुसरी बाजू नव्हे. ज्या बाजूस आपण गोल आकार करत तीच्या आकाराला मोठे केले आहे त्याची विरुद्ध दिशा. भाकरी उचलल्यावर जर ती तुटून खाली पडत नसेल तर समजावे कि आपले पिठाचे आणि पाण्याचे प्रमाण अगदी योग्य आहे. जर तुमचे प्रमाण चुकले तर भाकरी हातात घेताच क्षणी तिचे दोन तुकडे होतील. ) भाकरी आता तिच्या संपूर्ण बाजूने गोल आकार देत मोठी करून घ्यावी. आता भाकरीच्या संपूर्ण एकाच बाजूस हाताची सर्व बोटे उमटून घ्यावीत. आता भाकरी पहिला सारखी हातात घेऊन ज्या बाजून आपली बोटे उमटवली आहेत प्रथम ती बाजू खाली ठेवून तीला तव्यावर अथवा खापरीवर शेकविण्यासाठी ठेवावी. भाकरी शेकविण्याआधी गॅस ची आच मोठी ठेवावी आणि तवा चांगला तापवून घ्यावा. साधारण ३ मिनिटे एका बाजूने शेकवून घ्यावी. ३ मिनिटे झाल्यावर तीला उलटून तिची दुसरी बाजू देखील शेकवून घ्यावी. दुसरी बाजू शेकवत असताना तुम्हाला भाकरी फुगताना दिसेल. साधारण हि भाकरी दोन्ही बाजूने चांगला ताव देऊन ५ ते ७ मिनिटापर्यंत चांगली भाजून निघते. आता भाकरी टोपलीत किंव्हा मलमलच्या कपड्यावर काढून घ्यावी. गरमागरम भाकरी तय्यार ! हि भाकरी तुम्ही मस्त मासळीचा रस्सा, झणझणीत गावरान मटण चिकन सोबत खाऊ शकता.
Khup sopi method. Aavadali .
Khup chan.