कोलंबी दम बिरीयानी
साहित्य – २५ ते ३० मोठ्या कोलंबी, ५०० ग्रॅम बासमती तांदूळ,अर्धी वाटी पुदिनाची पाने, एक वाटी बारीक चिरलेलं टोम्याटो, अर्धी वाटी कोथिंबीर,२ चमचे आले लसणाची पेस्ट, ४ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, एक मोठा चमचा हळद, एक चमचा कसुरी मेथी, एक मोठी वाटी तळलेला कांदा, एक वाटी दही, ४ ते ५ मध्यम काप केलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा कच्च्या पपईची पेस्ट, एक वाटी पाणी, ४ मोठे चमचे तेल, १० ते १५ तळलेले काजू, २ चमचे घी, चवीनुसार मीठ, हवाबंद करण्यासाठी पिठाचा लगदा आणि आवश्यकते नुसार खायचा पिवळा रंग.
कृती – एका मोठ्या पातेल्यात कोलंबी घेऊन त्यात अर्धी वाटी पुदिनाची पाने ( थोडी पुदिनाची पाने आपण नंतर वापरणार आहोत ), एक वाटी बारीक चिरलेलं टोम्याटो, अर्धी वाटी कोथिंबीर, ४ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, एक मोठा चमचा हळद, एक चमचा कसुरी मेथी, एक मोठी वाटी तळलेला कांदा ( यातला थोडा तळलेला कांदा बाजूला काढून ठेवावा. ) एक वाटी दही, ४ ते ५ मध्यम काप केलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा कच्च्या पपईची पेस्ट, एक वाटी पाणी, ४ मोठे चमचे तेल, आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून किमान २ तास मुरण्यासाठी ठेवावे. २ तासानंतर बासमती तांदूळ स्वच्छ धुवून त्याला फक्त ५०% पर्यंतच शिजवून घ्यावा. तांदूळ शिजत असताना त्यात एक चमचा तेल टाकावे म्हणजे आपला भात सुटसुटीत होईल. भात शिजल्यावर एका चाळणीने त्याला चाळून सर्व पाणी गाळून घ्यावे. मुरवण्यासाठी ठेवलेली कोलंबी एकजीव करून घ्यावी. आता कोलंबीच्या पातेल्यात ५०% शिजलेला बासमती तांदूळ सर्वत्र पसरून घ्यावा. पसरवून झाल्यावर त्यावर थोडी पुदिनाची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. २ चमचे घी प्रत्येक ठिकाणी टाकावा. त्यावर आता उरलेला तळलेला कांदा टाकावा आणि तळलेले काजू टाकावे. सर्वात शेवटी एका चमचाच्या सहाय्याने पिवळा रंग थोडा थोडा शिंपडावा. ( आपणास हवी असल्यास हि बिरीयानी २ थरात देखील बनवू शकता. मी इथे एकच थर लावला आहे. ) आता या पातेल्यावर झाकण ठेवून हे झाकण पीठाने व्यवस्थित बंद करून घ्यावे. लक्षात ठेवा यातली थोडी देखील वाफ बाहेर जावू देवू नका. झाकण व्यवस्थित पीठाने बंद झाल्यावर या बिरीयानीला १० मिनिटे मोठ्या आचेवर शिजवून घ्या. १० मिनिटानंतर बिरीयानीच्या पातेल्याखाली एक तवा ठेवून या बिरीयानीला पुन्हा २० मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. २० मिनिटे झाल्यावर ग्यास बंद करा. थांबा बिरीयानी अजून झालेली नाही. ग्यास बंद केल्यावर किमान ३० मिनिटांनी सील केलेले पीठ काढून झाकण उघडे करा आणि गरमागरम बिरीयानीचा आस्वाद घ्या.
There are no comments